प्रेमाचा नवा अर्थ सांगणारा ” टीपी ” – रवी जाधव
‘बालक-पालक’ या सुपर डुपर हिट चित्रपटातून कुमारवयीन मुलांचं एक वेगळं भावविश्व पडद्यावर मांडल्यानंतर दिग्दर्शक रवी जाधव आता टाईमपास या चित्रपटातून एक आगळी वेगळी प्रेमकथा घेऊन येत आहेत. एस्सेल व्हिजन आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या या ” टीपी “ बद्दल सांगतायत खुद्द रवी जाधव.
१)” टीपी “ च्या कथानकाविषयी थोडक्यात काय सांगाल ?
रवी- ” टीपी “ ही पहिल्या प्रेमाची कथा आहे. कोवळ्या वयात एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, त्याबद्दल निर्माण होणारी ओढ आणि त्यातून मनात उमलणारी प्रेमाची भावना याची ही कथा आहे. चित्रपटाचा नायक दगडू हा दहावीत नापास झालेला,समाजाच्या दृष्टीने मवाली असणारा , झोपडपट्टीत राहणारा, घरोघरी पेपर टाकणारा मुलगा आहे. तो चाळीत राहणाऱ्या प्राजक्ताच्या प्रेमात पडतो. टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात आणि संस्कारात वाढलेल्या प्राजक्ताला दगडुचा निर्भीडपणा, त्याची टपोरी स्टाईल आवडायला लागते आणि ती पण त्याच्या प्रेमात पडते. त्यानंतर त्या दोघांच्या आयुष्यात काय बदल होतात याचं मजेशीर चित्रण म्हणजे “v “ .
२)” टीपी “ ची ही कथा तुम्हाला कशी सुचली ?
रवी– ‘नटरंग’ , ‘ बालगंधर्व ‘ , ‘बालक-पालक’ या चित्रपटाद्वारे यशाची हॅटट्रीक केल्यानंतर आता नवीन काय असा प्रश्न कायम मनात यायचा.यात बीपी मधून लहान मुलांच्या द्वारे मनोरंजना सोबतच एक संदेश देण्याचा प्रयत्नही आम्ही केला जो यशस्वी ठरला. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी अशा कथेच्या विचारात होतो जी सर्वांच्या आयुष्याशी निगडीत असेल तेव्हा मला आपलं “ पहिलं प्रेम “ हा धागा मिळाला. प्रत्येकानेच आयुष्यात प्रेम केलेलं असतं त्यातही पहिलं प्रेम हे सर्वांसाठी खास असतं. बहुतेकांच्या आयुष्यात हे प्रेम नकळत्या वयात येतं आणि ती भावना खूप मजेशीर असते. यातल्या बहुतेक प्रेमकथा या अर्धवटच राहतात पण त्या आपल्याला खूप काही शिकवून जातात. आज संवादाची माध्यमं मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना प्रेम ही भावना खूप प्रॅक्टिकल बनत जात आहे. प्रेमामध्ये नकार पचवण्याची वृत्ती लोप पावत असताना प्रेमाची एक सकारात्मक कथा लोकांसमोर मांडण्याचा विचार मनात आला ज्याला मी प्रेमातला ” पॉझिटिव्ह मॅडनेस ” असं म्हणतो. या विचारातूनच’ मला ही कथा सुचत गेली. पुढे प्रियदर्शन जाधव सोबत मिळून ती कागदावर उतरवली आणि आता ती प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत.
३) ” टीपी “ मधील कलाकारांबद्दल काय सांगाल ?
रवी- ” टीपी “ मध्ये दगडू च्या मुख्य भूमिकेत प्रथमेश परब तर प्राजक्ताच्या भूमिकेत केतकी माटेगावकर बघायला मिळणार आहे. बीपी मधून विशू च्या भूमिकेतून प्रथमेश ने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होतीच शिवाय यातील दगडू साठी मला तोच योग्य वाटत होता म्हणून त्याची निवड केली. प्राजक्ताच्या भूमिकेसाठी मला सुंदर, नाजूक आणि गोड गळ्याची मुलगी हवी होती कारण सिनेमात प्राजक्ताला गायनाची आवड दाखवलीये. या सगळ्या गोष्टी केतकी मध्ये आहेतच शिवाय तिला अभिनयाचीही जाण आहे, त्यामुळे तिची निवड झाली. याशिवाय टीपी मध्ये केतकीच्या कडक स्वभावाच्या वडिलांच्या भूमिकेत वैभव मांगले तर दगडूच्या वडिलांच्या भूमिकेत भाऊ कदम बघायला मिळतील. यांच्या सोबतीला मेघना एरंडे, उदय सबनीस,सुप्रिया पाठारे, भूषण प्रधान आणि उर्मिला कानिटकर यांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
४)संगीत हा तुमच्या सिनेमाचा कायम प्लस पॉंईंट ठरलेला आहे. आताही ” टीपी “ ची गाणी सध्या सगळीकडे खूप गाजत आहेत. याबद्दल काय सांगाल ?
रवी- संगीत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे माझ्या प्रत्येक चित्रपटात श्रवणीय संगीत असण्याबद्दल मी आग्रही असतो. आणि त्यात टीपी ही तर एक प्रेमकथा आहे , त्यामुळे प्रेमकथेसाठी चांगलं सुमधुर संगीत असणं अनिवार्य आहे असं मी मानतो. टीपी चं संगीत चिनार – महेश या युवा जोडगोळीने केलं असून यातील गीते गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे आणि जी. एच. पाटील यांची आहेत. ही गाणी स्वप्नील बांदोडकर, महालक्ष्मी अय्यर, बेला शेंडे, चिनार खारकर, आनंद मेनन आणि केतकी माटेगावकर या आजच्या लोकप्रिय गायकांनी गायली आहेत. शिवाय यात आगरी भाषेचा तडका असलेलं ‘ही पोळी साजूक तुपातली’ हे धम्माल गाणं आहे जे “ रिक्षावाला फेम “ गायिका रेश्मा सोनावणेनी गायलं आहे.
५)” टीपी “ हा चित्रपट एस्सेल व्हिजन आणि झी टॉकीज प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहे. नटरंग नंतर रवी जाधव आणि झी टॉकीज हे समीकरण पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे.
रवी – बरोबर आहे. झी मराठी वाहिनी , एस्सेल व्हिजन यांच्यासोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत. माझ्या करीअरची सुरुवातच त्यांच्यामुळे झाली. नटरंग ने यशाचे सर्व विक्रम मोडीत काढत एक नवा इतिहास रचला. हे सर्व शक्य झालं ते झी च्या दूरदृष्टीमुळे.आणि आताही आम्ही परत एकदा सज्ज झालो आहोत, प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी. त्यामुळे येत्या ३ जानेवारी ला प्रदर्शित होणाऱ्या टीपीच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवीन वर्षाची एक विशेष भेट आम्ही देत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.