Fandry – Reader’s View

MarathiStars Reader Ruturaj Vaidya writes about Fandry. Check out his view –

फँड्री- सामाजिक विषमतेतून बाहेर पडण्याची धडपड –

फँड्री गोष्ट आहे एका सामाजिक विषमतेची ज्यात आपला समाज अजूनही गुरफटला आहे आणि त्यातून बाहेर येणाऱ्याला परत परत कसं त्यातच ढकललं जातं याची. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फँड्री, ही सामाजिक तेढ एका शोडशवर्षीय मुलाच्या प्रेमाच्या आकर्षणातून मांडण्याचा प्रयत्न करतो आणि एकंदरीत त्यावर विचार करण्यास नक्कीच भाग पाडतो.

जब्या (सोमनाथ अवघडे) हा अकोळनेर या एका लहानश्या गावातील एका मागास जातीतील अत्यंत गरीब कुटुंबामधला शोडशवर्षीय मुलगा, ज्याला त्याच्याच शाळेमधील शालू (राजेश्वरी खरात) ही एका वरच्या जातीतील आणि श्रीमंत घरातील मुलगी आवडते. वरकरणी ह्या एका ओळीत संपणाऱ्या कथेत दिग्दर्शकाने खूप साऱ्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जब्या अशा एका जमातीमधे जन्माला आला आहे की ज्यांना गावातील ‘फँड्री’ म्हणजेच डुक्करे पकडण्यासारखे खालचे काम करावे लागते जे त्याला स्वतःला मान्य नाही. जब्याचे वडील कचरू (किशोर कदम) हा एक उतारवयाकडे झुकणारा गरीब माणूस, ज्याला आपल्या मुलाला शाळा सोडून काम करायला लावणं आणि तसच पारंपारिक डुक्करे पकडण्यासाठी त्याच्या इच्छेविरुद्ध ओढणं आणि मग यातूनच जब्याचा त्याच्या वडिलांबरोबर आणि समाजसंस्थेविरुद्धचा संघर्ष म्हणजेच फँड्री!

Rajeshwari Kharat & Somnath Awghade Fandry Marathi Movie Wallpapers
Rajeshwari Kharat & Somnath Awghade Fandry Marathi Movie Wallpapers

जब्याची तरल प्रेमकहाणी उभी करत असतानाच त्याचं एका गरीब कुटुंबात जन्माला आल्याने त्याची होणारी ससेहोलपट, ऐन शिकण्यासवरण्याच्या काळात वडिलांसोबात कष्ट करून कुटुंबाला करावी लागणारी मेहनत, हलक्या प्रतीची कामे शाळेतल्या मुलांसमोर आणि तसेच आपल्या आवडत्या मुलीसमोर करायला लागू नयेत म्हणून करायला लागणारी धडपड अशी बरीचशी अंगे समोर आणण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय. जब्याची कौटुंबिक आणि सामाजिक फरफट बऱ्याचदा काळीज चिरून जाते. साध्या साध्या आणि दैनंदिन गोष्टीत दाखवून दिला जाणारा जातीय कमीपणा आपल्यातल्या ‘स्वयम’ला सुद्धा विचार करायला लावतो. जब्याचं जाणतं अजाणतं वय, मग त्यातून त्याचा समाजव्यवस्थेविरुद्ध होणारा नकळत विरोध, पण तोच समाज त्या विरोधाला झुगारून त्याला परत परत त्यातच ढकलणाऱ्या या समाजाबद्दल राग आल्यावाचून राहत नाही. नागराज मंजुळे ही सामाजिक तेढ दाखवण्यात जेवढा यशस्वी झालाय तेवढाच यशस्वी तो एका लहानश्या खेड्यातलं दैनंदिन जीवन दाखवण्यात सुद्धा तितकाच यशस्वी झालाय. गावातली समाजव्यवस्था, राहणीमान, बोली या गोष्टी तर उत्तम साधल्या आहेतच परंतु गावात आजकाल शौचालय नसून इंटरनेट कनेक्शन वाले मोबाईल फोन, फेसबुक, आयपीएल सारख्या लेटेस्ट गोष्टींचं आकर्षण एवढा पुढारलेपणा असूनही काहीशी काळ्या जादूची छटा वैगेरे त्याने डार्क ह्युमर प्रकारात दाखवून दिल जीत लिया है.

एवढ्या सगळ्या जमेच्या बाजू असताना काही तांत्रिक बाबीत चित्रपट काहीसा मागे पडल्यासारखा वाटतो. चित्रपटाची कथा, संवाद, पार्श्वसंगीत, कलाकारांच्या भूमिका उत्तमच आहेत परंतु चित्रपटाला एक कंटेम्पररी लुक देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अर्धवट सोडून दिलेले सीन्स थोडे खटकतात. ते वगळता सर्व कलाकार भूमिका करत नसून ती भूमिका स्वत: जगत असल्याचा फिल म्हणजे  जबरदस्तच. किशोर कदम बेस्टच, कायम प्रमाणे. त्यांचा ‘कचरू’ किंवा ‘कचर्या’ जमून आलाय. जब्याचा खास मैतर ‘पिर्या’ म्हणजेच सुरज पवार याची जब्याला साथ फक्त भूमिकेतच नाही तर अॅक्टिंगमध्येपण समर्थ साथ म्हणता येईल. राजेश्वरी खरातची ‘शालू’ खरच प्रेमात पडण्यासारखी. बाकी गावकरी एकसे एक इरसाल आणि नमुने म्हणजेच नागराजच्या परफेक्ट निवडीची पावती. या सगळ्यांमध्ये ‘छा’ गया म्हणजे सोमनाथ अवघडेचा जब्या. सोमनाथने जब्या सिम्पली परफेक्ट आपल्यासमोर उभा केला आहे.

Kishor kdam & Chaya kadam - Still From Fandry Marathi movie
Kishor kdam & Chaya kadam – Still From Fandry Marathi movie

एकंदरीत फँड्री वेगळ्या धाटणीचा, सामाजिक संस्थेवर बोट ठेवणारा आणि तितकंच प्रभावीपणे विचार करायला लावणारा सिनेमा आहे. चित्रपटातले सर्वात उत्तम आणि आणि प्रभावी सीन्स म्हणजे जब्या आणि त्याची बहीण पकडलेले डुक्कर घेऊन जात असताना बॅकग्राउंडला असणारी शाळेच्या भिंतीवर काढलेली बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, जोतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांची चित्रे. या महान लोकांच्या सामाजिक चळवळी कशा आपण धुळीत मिळवल्यात याची जाणीव करून देणारी फ्रेम. हा सीन म्हणजे सिंपली अमेझिंग! आणि लास्ट बट नॉट लिस्ट म्हणतात तसंच सिनेमाचा शेवटचा सीन ज्याला तुम्ही घेऊन बाहेर पडता. इस दो सीन्स के लिये बाकी सब गलतियाँ माफ! या सीन्स बद्दल एकच शब्द- चपखल.

रेटिंग– ३.५ आऊट ऑफ 

Ruturaj Vaidya is movie fanatic, critic, technology expert, nature enthusiast, traveller and blogs at Flirtingwithmovies .