‘समांतर’ या वेब सिरीजला अवघ्या ३ दिवसात मिळाली ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती..

samantar mx player new marathi web series mx player

सगळ्यांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी हा अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’ नावाच्या मराठी वेब मालिकेतून भेटीला आला असून स्वप्नील जोशीने कुमार महाजन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या बरोबर तेजस्विनी पंडीत ही अभिनेत्री सुद्धा या सिरीजमध्ये दिसली आहे. या मालिकेची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने केली असून पहिल्यांदाच वेब सिरीज सेगमेंटकरिता त्यांनी भागीदारी केली आहे. ही वेबसिरीज ओव्हर-द-टॉप (ओटीटी) वर प्रदर्शित झाली आणि ‘एमएक्स प्लेयर’च्या वेब सिरीज सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. ‘समांतर’ ही वेबमालिका सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ कादंबरीबर आधारित असून प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.

‘समांतर’ या वेब मालिकेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत असून प्रेक्षकांना या वेबमालिकेतील स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि इतर कलाकारांची देखील कामे आवडत आहेत. कुमार महाजनचे भविष्य सुदर्शन चक्रपाणी या माणसाशी कसे जोडले गेले आहे आणि आपले भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार महाजन चक्रपाणी पर्यंत कसा आणि कोणकोणत्या संकटाना समोर जात त्याचा शोध घेतो हा सगळा प्रवास पाहणे प्रेक्षकांसाठी अतिशय रंजक ठरत असून ही वेबमालिका “एमएक्स प्लेयर” या अग्रगण्य ओटीटी मंचावर उपलब्ध असून या मालिकेला फक्त ३ दिवसात ८० लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. ही मालिका दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत असून आजपर्यंतच्या मराठी वेबच्या इतिहासातील ‘समांतर’ ही मालिका सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली मालिका बनली आहे.Samantar Marathi Web Series Swapnil Joshi Gseams

स्वप्नील जोशी म्हणतो की, “समांतर’चे लेखन सुहास शिरवळकर यांनी केले असून ती माझी आवडती कादंबरी आहे. या आधी मी त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या अणि काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘दुनियादारी’ या सिनेमात काम केले होते. मला मनापासून वाटते कि, त्यांच्या लेखणीत खूप ताकद आहे आणि त्यांच्या लिखाणावर खूप चांगले काम होऊन उत्तम दर्जाचा व्हिजुअल कॉन्टेन्ट तयार होऊ शकतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला ‘समांतर’ करायला मिळते आहे. ‘दुनियादारी’ केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाशी जोडले जाणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. श्रीमती शिरवळकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मी ऋणी आहे कारण हे शिवधनुष्य पेलण्यासाठी त्यांनी माझ्यावर, सतीश राजवाडे आणि ‘जीसिम्स’ वर विश्वास दाखवला.”

स्वप्नील जोशी पुढे म्हणाला की, “सतीशवर सुद्धा या पुस्तकाचा फार मोठा प्रभाव आहे. या कथेसाठी तो एक योग्य असा दिग्दर्शक आहे. या मालिकेच्या माध्यमातून सतीश आणि मी एकत्र येत आहोत. त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते ‘जीसिम्स’ने कथेचे दर्जेदार मालिकेत रूपांतर करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. संपूर्ण तंत्रज्ञ चमू आणि कलाकारांनी या मालिकेसाठी अणि ती दर्जेदार होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ‘समांतर’मध्ये माझी कुमार नावाची भूमिका आहे आणि ही व्यक्तिरेखा मी याआधी केलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळी आहे. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. त्याचबरोबर ही मालिका ‘एमएक्स प्लेयर’सारख्या कंपनीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली असल्याने ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल याची मला पूर्ण खात्री आहे.”

“शुभारंभ झाल्यापासून या मालिकेला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत ही मलिका ८० लाख लोकांनी पाहिली असून मराठी वेबसीरिजच्या इतिहासातील ही सर्वाधिक संख्या आहे. या मालिकेचे आता हिंदी, तमिळ अणि तेलगू भाषांतर होत असून त्याद्वारे ती मराठीखेरीज इतर भाषामध्येही दिसणार आहे,” असे उद्गार निर्माते अणि ‘जिसिम्स’चे प्रमुख अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले. “समांतर’च्या या यशामुळे निर्माते म्हणून आम्हांला अशाप्रकारच्या अधिकाधिक वेब सीरिजची निर्मिती करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे,” असेही ते म्हणाले.

Tags

MARATHI WEB SERIES ON MX PLAYER, avntika 3 web series, all marathi web series, samantar marathi websearise,