पुणे व्हाया बिहार सुमधूर गीतांची ध्वनीफित प्रकाशित
प्रेम या भावनेला कशाचीच बंधने नसतात.
ना जाती-धर्माची, ना वयाची, ना भाषेची, ना राज्याची ना देशाची..
या सर्व सीमा पार करून प्रेमाचे बंध बांधले जातात. प्रेमासाठी गरज असते ती दोन प्रेमळ मनांची. ही मने जुळली की मग सर्व बंधने आणि सीमा आपसुकच गळून पडतात, पण.. प्रेमाला विरोध करणारी मंडळी कायम या बंधनातच अडकून पडलेली असतात. याच बंधनातून आपल्या प्रेमाला मुक्त करू पाहणाऱ्या प्रेमवीरांची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ‘पुणे व्हाया बिहार’ या आगामी मराठी चित्रपटातून.
नावातच वेगळेपणा असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे शेमारू एण्टरटेन्मेंटच्या अतुल मारू, केतन मारू यांनी तर याचे दिग्दर्शन केले आहे लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी. चित्रपटात उमेश कामत, मृण्मयी देशपांडे, अरूण नलावडे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘पुणे व्हाया बिहार’ ची कथा आहे अभिजीत भोसले आणि तारा यादवची. औरंगाबादच्या इंजिनियरींग कॉलेजमध्ये शिकणारे हे विद्यार्था. अभिजीतला तारा मनापासून आवडते पण त्याबद्दलची जाणीव ताराला नाहीये. तारा ही बिहारमधील एका प्रतिष्ठित राजकारण्याची मुलगी आहे. वडील स्वत:च्या राजकारणासाठी आणि सत्तेसाठी ताराचा उपयोग करण्याचं ठरवतात. यासाठी बिहारमधील एका बाहुबली नेत्याशी तिचं जबरदस्तीने लग्नं ठरवतात. या चक्रात अडकलेल्या ताराला सोडवण्यासाठी अभिजीत थेट बिहार गाठतो आणि ताराला वडिलांच्या जाचा तून सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. यामध्ये अभिजीत यशस्वी होतो का? त्याच्या प्रेमाची जाणीव ताराला होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणारी कथा म्हणजे ‘पुणे व्हाया बिहार’ हा चित्रपट.
या चित्रपटात अभिजीत भोसलेची भूमिका उमेश कामत तर ताराची भूमिका मृण्मयी देशपांडे साकारतेय. या चित्रपटात भरत जाधव इन्स्पेक्टर निंबाळकरच्या डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी लिहिली असून छायांकन राजा सटाणकर यांचे आहे. आनंद दिवाण यांचे संकलन तर अविनाश खर्शाकर आणि रत्नाकांत जगताप यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.
‘पुणे व्हाया बिहार’ या चित्रपटात एकूण तीन गाणी असून ती सचिन गोस्वामी यांनी लिहिली आहेत. तर अमर हडकर यांनी ती संगीबध्द केली आहेत. ज्यामध्ये ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हे गाणं रणबीर आणि चंग यांनी गायले आहे. तरूणाईला थिरकायला लावणारं उडत्या चालीचं असलेलं ‘पिंग पाँग पिंग पाँग’ हे गीत अवधूत गुप्ते, भालचंद्र कदम आणि नेहा राजपाल यांनी गायले आहे. याशिवाय बिहारच्या पार्श्वभूमीवरचं ‘कच्ची कैरी हूँ मैं हूँ’ हे गाणं हिंदीतील प्रसिध्द गायिका सोनू कक्कड आणि हिंदी सारेगमप फेम राजा हसन यांनी गायलं आहे.
प्रेमाची एक ‘वेगळी गोष्ट’ सांगणारा शेमारू एण्टरटेन्मेंट निर्मित ‘पुणे व्हाया बिहार’ हा चित्रपट 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तोपर्यंत यातील गाणी प्रेक्षकांना आवडतील आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकताही वाढवतील असा विश्वास आहे.