‘म्हैसकर मिक्ता’ 2013 चा पुण्यात जल्लोष’
कलाकारांच्या दिंडीने मिक्ता समारोहाची सांगता
मराठी चित्रपट आणि नाटकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लोबल ओळख मिळवून देणारा ‘म्हैसकर मिक्ता’ पुरस्कार यंदा मकाऊ येथे रंगणार आहे. या पुरस्काराचे पूर्वरंग मांडणारा ‘मिक्ता महोत्सव 2013’ची मोठया दिमाखात पुण्यामध्ये सुरूवात झाली आहे. 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान रंगणा-या या महोत्सवात निवडक मराठी चित्रपट आणि नाटकांसोबतच विविध सांस्कृतिक सोहळयाची अनोखी मेजवानी रसिक पे्रक्षकांना सध्या अनुभवायला मिळत आहे. पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात ‘मिक्ता’ नाटयमहोत्सव भरला असून ‘मिक्ता’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन सिटी प्राईड कोथरूड येथे करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्र कलानिधी’ आणि ‘म्हैसकर फाऊंडेशन’चे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या या सोहळयाची संकल्पना महेश मांजरेकर यांची आहे. रविवारपासून सुरू झालेल्या मिक्ता महोत्सवात मान्यवर परिक्षक आणि पे्रक्षकांनी निवडलेल्या दहा चित्रपट आणि दहा नाटकांचा आस्वाद रसिक घेत आहेत. या महोत्सवामध्ये ‘प्रपोजल’, ‘गेट वेल
सून’,‘ठष्ट’, ‘डू अँड मी ’, ‘एकदा पहावं न करन’, ‘फॅमिली ड्रामा’, ‘सुखान्त’, ‘ड्राय डे’,‘उणे पुरे शहर एक’, ‘ती गेली तेव्हा’ या नाटकांचा समावेश असून चित्रपटांमध्ये ‘दुनियादारी’, ‘टाइम प्लीज’, ‘आजचा दिवस माझा’, ‘72 मैल एक प्रवास’,‘ बालक पालक’, ‘ प्रेमाची गोष्ट’, ‘इन्व्हेस्टमेण्ट’, ‘अनुमती’, ‘आयना का बायना’, ‘धग’ यासारखे गाजलेले चित्रपट पुणेकरांना महोत्सवात पहाता येणार आहे. यासोबतच मिक्ता महोत्सवाच्या माध्यमातून विविधरंगी कार्यक्रमांचा नजराणाही प्रेक्षकांना मिळत आहे.
या मिक्ता महोत्सवाची सांगता येत्या 8 सप्टेंबरला होणार असून या दिवशी पुण्यामध्ये मराठी कलावंत आणि तंत्रज्ञांची दिंडी सकाळी 10.30 वा. पुण्यातील पौड फाटा रोडवरील दशभुजा गणपती मंदिर ते यशवंतराव चव्हाण नाटयगृह अशी निघणार आहे. या दिंडीमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार सहभागी होणार आहेत.