मामि चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार, पिफमध्ये मानाच्या संत तुकाराम पुरस्कारासह इतर चार पुरस्कार मिळवणारा आणि बंगलोर, अबुधाबी, लंडन सारख्या देश विदेशांतील मानाच्या चित्रपट महोत्सवांत पुरस्कारांची ठसठशीत मोहोर उमटवणारा आणि समीक्षकांबरोबरच रसिकांचीही उदंड दाद मिळवणारा ‘फॅंड्री‘ हा बहुचर्चित मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात ‘फॅंड्री’ मोठ्या दिमाखात झळकणार आहे. ‘दुनियादारी’ आणि ‘टाइमपास’ या लागोपाठ दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांनंतर एस्सेल व्हिजन आणि झी टॉकीज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत. नागराज मंजुळे या नव्या आणि सर्जनशील दिग्दर्शकाने फॅंड्रीचे दिग्दर्शन केले आहे.
समाजव्यवस्थेतील जातीव्यवस्थेचं दाहक वास्तव प्रेमकथेच्या रूपातून नागराज मंजुळे याने ‘फॅंड्री‘ मध्ये मांडलंय. दोन विभिन्न जातीतील जब्या आणि शालूची ही कथा. शालूचं प्रेम मिळवण्यासाठी, आपल्या भावना तिच्यापर्यंत पोचवण्यासाठी जब्याची चाललेली आंतरिक धडपड अशी फॅंड्रीची कथा असली तरी प्रेमकथेबरोबर हा चित्रपट समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर ज्वलंत भाष्य करतो.
नागराज मंजुळे यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती निलेश नवलाखा यांच्या नवलाखा आर्ट्स आणि विवेक कजारिया यांच्या होली बसीलची निर्मिती असलेल्या’फॅंड्री’ची प्रस्तुती एस्सेल व्हिजनची आहे. सोमनाथ अवघडे, सूरज पवार, राजेश्वरी खरात, छाया कदम, प्रविण तरडे, किशोर कदम आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयाने फॅंड्री सजला आहे. या चित्रपटाचे संवाद नागराज सोबत भूषण मंजुळे यांनी लिहिले आहेत. छायांकन विक्रम अमलादी यांचे असून संकलन चंदन अरोरा, पार्श्वसंगित अलोकनंदा दासगुप्ता आणि कला दिग्दर्शन संतोष संखद यांचे आहे.
मराठी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी ‘फॅंड्री’ला कौतुकाची थाप दिली. रजत कपूर, अमोल गुप्ते, अतुल कुलकर्णी, दिव्या दत्ता, रेणुका शहाणे, रवि जाधव, महेश लिमये, विजू माने, जितेंद्र जोशी, डॉ. जब्बार पटेल या आणि अशा अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी तर फॅंड्री बघितल्यानंतर आपल्याला पाथेर पांचाली या चित्रपटाची आठवण झाली अशी मौल्यवान प्रतिक्रिया दिली.
भारतीय चित्रपटक्षेत्रातील अनेक प्रतिभावंतांनी गौरवलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. येत्या १४ फेब्रुवारीला प्रेमाची एक आगळी वेगळी परिभाषा मांडणारा ‘फॅंड्री हा मराठी चित्रपट महाराष्ट्रभर दाखल होईल.