Encounter Specialist Bharat Jadhav – Pune Via Bihar

कोणत्याही व्यक्तिरेखेत लीलया शिरत ती भूमिका आपल्या सहज अभिनयाने साकारण्यात तरबेज असणा-या भरत जाधवच्या अभिनयाचा आणखी एक आकर्षक पैलू आगामी ‘पुणे व्हाया बिहार’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटात भरतने प्रताप निंबाळकर हा धडाकेबाज एनकाऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी साकारलाय.

आजवर अनेक खतरनाक गुंडांना आपल्या बंदुकीने यमसदनी धाडणा-या या इन्स्पेक्टरची अंडरवर्ल्डमध्ये जबरदस्त दहशत आहे. प्रेमाला असलेल्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पुण्याच्या अभिजीत (उमेश कामत) सोबत बिहारची तारा यादव (मृण्मयी देशपांडे) पळून जाते. बिहारमधील राजकीय नेते असलेले ताराचे वडील रामलाल यादव तीला परत आणण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर प्रताप निंबाळकरवर (भरत जाधव) सोपवतात. ताराला परत आणण्याच्या आव्हानात्मक मोहिमेत बिहार ते पुणे या प्रवासादरम्यान अनेक रोमांचक आणि थरारक घटना घडतात. या मोहिमेत प्रताप निंबाळकर यशस्वी होतो का? हे ‘पुणे व्हाया बिहार’ या चित्रपटात पहाणे नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘मस्त चाललंय आमचं’ चित्रपटात भरत जाधव यांनी माधव भट हा तत्वनिष्ठ ब्राम्हण साकारला होता आणि आता ‘पुणे व्हाया बिहार’मध्ये एनकाऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिका-याची वेगळ्या लूकमधील भूमिका साकारली आहे. प्रेमीयुगलाची धडपड आणि वरिष्ठांचा आदेश पाळताना होणारी तगमग याने व्यथीत झालेला निंबाUकर अभिनेता भरत याने तीव्रतेने रेखाटलाय. युथफुल लव्हस्टोरी, बहारदार संगीत आणि जबरदस्त अॅक्शन असे ‘फुल ऑन इंटरटेनिंग पॅकेज’ असलेला ‘पुणे व्हाया बिहार’ चित्रपट 31 जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होतोय.