Doodle Social Ad Festival 2014 in Pune

‘मंथन – स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँड आर्ट’ या जाहिरात शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे शाखेच्या वतीने ‘डूडल सोशल अॅड फेस्टिव्हल २०१४’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक ६ मार्च ते ९ मार्च २०१४ या कालावधीत घोले रस्ता येथील न्यू आर्ट गॅलरी येथे हा महोत्सव भरवण्यात येणार असून याद्वारे अॅडव्हर्टायझिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच जाहिरातींच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.

‘डूडल सोशल अॅड फेस्टिव्हल २०१४’ या महोत्सवाचे उद्घाटन मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक व प्रसिद्ध अॅड-फिल्म मेकर रवि जाधव यांच्या हस्ते दिनांक ६ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता करण्यात येणार असून याप्रसंगी विशेष आतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ व प्रमुख पाहुणे म्हणून विख्यात चित्रपट समिक्षक समर नखाते उपस्थित राहणार आहेत. आपल्या सर्जनशील विचारांनी आणि कल्पक दिग्दर्शनाने विविध अॅड फिल्म्सची यशस्वी निर्मिती करणारे दिग्दर्शक रवि जाधव यांचे व्याख्यान ‘डूडल सोशल अॅड फेस्टिव्हल’च्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

सामाजिक जाणीव निर्माण करणे व जाहिरात क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे या उद्देशाने ‘डूडल सोशल अॅड फेस्टिव्हल २०१४’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाचे आयोजक प्राचार्य शशिकांत गवळी, कादंबरी भांडारी व योगेश भांडारी यांनी दिली. गेल्या वर्षीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून पहिल्या वर्षी हा महोत्सव मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावर्षी मुंबईसोबतच पुणे शहरातील विद्यार्थ्यांपर्यंत हा महोत्सव पोहोचावा तसेच येथील विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना जाहिरात क्षेत्रातील मातब्बर असामींना भेटण्याची, त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळावी यासाठी पहिल्यांदाच पुणे शहरामध्ये अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन होत असल्याचेही आयोजकांनी आवर्जून सांगितले.

या उपक्रमास विद्यार्थ्यांचा आणि नवोदित व्यावसायिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भारतासोबतच बाहेरील देशातूनही बहुसंख्य विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. या उदंड प्रतिसादामुळे सामाजिक जाणीवा जागृत करणारा हा महोत्सव जाहिरात क्षेत्रासाठी एक वेगळा पायंडा पाडेल असा विश्वासही महोत्सवाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे.

सदर महोत्सवादरम्यान जाहिरात क्षेत्रातील दिग्गज व्यावसायिकांची व्याख्याने व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये दिनांक ८ मार्च रोजी ‘ओगिल्व्ही अँड मॅथर’ या जगप्रसिद्ध जाहिरात संस्थेचे क्रिएटिव्ह सुपरव्हायझर म्हणून कार्यरत असलेले श्री. सौरभ चांदेकर ‘जाहिरातींमधील कल्पकता’ या विषयावर बोलणार आहेत. त्यानंतर ‘मंथन – स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँड आर्ट’ संस्थेचे संस्थापक-संचालक प्राचार्य शशिकांत गवळी ‘जाहिरात क्षेत्रातील करिअरच्या संधी’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर दिनांक ९ मार्च रोजी ‘पिनस्टॉर्म’ या जाहिरात संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संजय खरे ‘पॉवर ऑफ ब्रँड’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार असून त्यानंतर ‘पब्लिसिस ग्रुप’चे श्री. राजेश कुलकर्णी हे ‘कॉर्पोरेट कंपन्यांचे ब्रँडिंग’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. याव्यतिरिक्त महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अॅड फिल्म्स दाखवण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकांनी गौरवण्यात येणार आहे. सदर महोत्सवाची सांगता दिनांक ९ मार्च रोजी होणार आहे.

‘मंथन – स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँड आर्ट’ या संस्थेच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. संस्थापक व संचालक प्राचार्य शशिकांत गवळी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जाहिरात क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते तसेच विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करणे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासनातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या स्टेट आर्ट स्पर्धेमध्ये ‘मंथन – स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँड आर्ट’ या संस्थेतील विद्यार्थ्यांनी अनेक पुरस्कार मिळवले असून ही संस्था जाहिरात प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रेसर संस्था म्हणून नावारुपास आली आहे. व्यावसायिकतेसोबतच सामाजिक आत्मभान जपण्यासाठी या संस्थेच्या वतीने ‘डूडल सोशल अॅड फेस्टिव्हल २०१४’ आयोजित करण्यात येत असून या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी 8655097715 या क्रमांकावर संपर्क साधावा.