मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्यांची ओळख ही केवळ त्यांच्या लूक्स पुरती मर्यादित न राहता त्यांच्या अभिनय कौशल्याद्वारे ते अधिक स्मरणात राहतात. मराठी सिनेसृष्टीतील असाच एक अभिनेता म्हणजे संदीप पाठक. संदीप हा मूळचा बीड जिल्ह्यातील माजलगावचा रहिवासी. मात्र अभिनयाच्या आवडीपोटी त्याने पुण्यातील ललित कला केंद्रातून नाट्य शास्त्राची पदवी संपादन केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला संदीपचा अभिनय क्षेत्रातील प्रवास. अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये काम केल्यानंतर संदीपला व्यावसायिक रंगभूमीवर पहिली संधी मिळाली ती म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘सर आली धावून’ या नाटकात. या नाटकात त्याने दस्तुरखुद्द लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले. या नाटकात संदीपने साकारलेल्या मुरलीधर कोयंडे ह्या भूकंप पीडिताच्या भूमिकेला प्रेक्षकांंसोबतच लक्ष्मीकांत बेर्डेे यांंची देखील कौतुकाची थाप मिळाली.
२००१ साली संदीपने मुंबईत पाऊल ठेवले आणि विविध मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकाद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटसम्राट, एक हजाराची नोट यांसारखे दर्जेदार चित्रपट, जादू तेरी नजर, व्यक्ती आणि वल्ली, सखाराम बाईंडर, वऱ्हाड निघालंय लंडनला यांसारखी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी नाटकं, हसा चकटफू, असंभव, रुद्रम यांसारख्या लोकप्रिय मालिका ह्या कलाकृतींनी संदीपची कारकीर्द समृध्द केली. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही त्याने चपखलपणे रंगवल्या आहेत.
ह्या प्रवासात त्याला कधी प्रसिद्धी मिळाली तर कधी निराशेला सामोरं जावं लागलं. परंतु मिळालेल्या प्रसिद्धीची हवा त्याने कधी डोक्यात जाऊन दिली नाही की कधी निराशेच्या गर्तेत अडकून त्याने माघार घेतली नाही. वाट्याला आलेल्या छोट्या छोट्या भुमिकाही त्याने आनंदाने स्विकारल्या. आता तब्बल २० वर्षांनतर संदीप पहिल्यांदा ‘ईडक’ ह्या चित्रपटाद्वारे नायक म्हणून आपल्यासमोर येणार आहे . शरद केळकर निर्मित आणि दीपक गावडे दिग्दर्शित हा चित्रपट झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज प्रदर्शित होत आहे.
संदीपची ही वीस वर्षांची कारकीर्द नक्कीच नवीन कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरेल.त्याची ही अभिनय क्षेत्रातील वाटचाल उत्तरोत्तर अशीच बहरत जाओ याच सदिच्छा.