महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी धुरळा उडतच असतो. मात्र महाराष्ट्राने ह्या महिन्याभरात एक राजकीय सिनेमाच पाहिलाय. कारण एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशा घडामोडी महाराष्ट्राच्या यंदाच्या राजकारणात घडल्या आहेत.
आणि याच राजकीय वातावरणात एका मराठी सिनेमाचा टीजर युट्युबवर रिलीज करण्यात आला. हव्वा कुनाची रं? हव्वा आपलीच रं. ह्या ‘धुरळा’ डायलॉगने तर टीकटॉक, इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल झालेले आपण पहिले.
‘धुरळा’ हा सिनेमा महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित आहे असा अंदाज टीजर बघितल्यावर नक्कीच येतो. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची परिस्थिती आणि त्याच वातावरणात धुरळा सिनेमाचा टीजर रिलीज होणे हा योगयोग म्हणावा की पूर्वनियोजित सिनेमा???
ह्या सगळ्यात भर अशी कि सोशल मिडीयावर एका फोटोत डाव्या बाजूला सुप्रिया सुळे आणि उजव्या बाजूला सई ताम्हनकर, दुसऱ्या फोटोत आदित्य ठाकरे आणि अमेय वाघ एकत्रित, तिसर्यात धनंजय मुंडे आणि अंकुश चौधरी तर चौथ्यात प्रणिती ताई शिंदे यांच्या शेजारी सोनाली कुलकर्णीचा असा फोटो. हे सगळे कलाकार खरोखरच या राजकारणी मंडळींच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत का? अशी चर्चा सगळीकडे चालू आहे!
सामना, सिंहासन, वजीर, सरकारनामा, ते अगदी आजचा दिवस माझा, मराठीत राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सिनेमांची परंपरा कायम राहिली आहे. क्षितीज पटवर्धन लिखित, समीर विद्वांस दिग्दर्शित आणि ‘झी स्टुडिओज’ निर्मित ‘धुरळा’ हि त्या परंपरेत मानाचं स्थान पटकावेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!