No change in Rajeev Patil’s Vanshvel release date

‘सावरखेड एक गाव’,‘ब्लाइंड गेम’,‘सनई चौघडे’सारखे वेगळ्या विषयांवरचे चित्रपट असो वा कादंबरीवर आधारित ‘पांगिरा’,‘जोगवा’,‘72 मैल एक प्रवास’ सारखे सामाजिक विषयांवर स्पर्श करणारे चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतींतून चांगला आशय मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजीव पाटील आपल्या आगामी ‘वंशवेल’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक होते. हा चित्रपट घरोघरी पोहोचावा अशी त्यांची इच्छा होती. पंरतु त्यांच्या या अकाली निधनाने वंशवेल चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतीत त्यांच्या चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. परंतु राजीव पाटील यांचे स्वप्न असलेला ‘वंशवेल’ ठरविलेल्या तारखेदिवशीच म्हणजेच 18 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येत असल्याचे चित्रपटाचे निर्माते सुनील मानकर यांनी सांगितले.

यासंदर्भात सुनिल मानकर यांनी राजीव पाटील यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली असता, त्या सगळ्यांनीच ‘वंशवेल’ हा केवळ चित्रपटच नाही, तर ते राजीव यांचे स्वप्न होते अशी प्रतिक्रिया दिली. राजीव पाटील जरी आपल्यात नसले तरी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे अशीच त्यामागची भावना होती.

Vanshvel Marathi Movie Still Photo
Vanshvel Marathi Movie Still Photo

चित्रपटातील सर्व कलाकार या दु:खातून सावरत राजीव पाटील यांच्या या स्वप्नपूर्तासाठी पूर्वीच्याच जोमाने प्रयत्न करणार असल्याची माहितीही निर्माते सुनील मानकर यांनी दिली. हा चित्रपट ठरल्या तारखेला प्रदर्शित करण्यासोबतच तो यशस्वी करणे हीच ख-या अर्थाने राजीव पाटील यांना श्रध्दांजली ठरेल अशी भावना ही यातील कलाकारांनी आणि चित्रपटाच्या टीमने व्यक्त केली.

‘अर्चित फिल्मस्’ बॅनरच्या ‘वंशवेल’ या चित्रपटात अंकुश चौधरी, किशोर कदम, सुशांत शेलार, शंतनू गंगावणे, मनिषा केळकर, नम्रता गायकवाड, विद्या करंजीकर, उषा नाईक या कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत. दामोदर मानकर यांची कथा असलेल्या‘वंशवेल’या चित्रपटाचा कथाविस्तार आणि पटकथा ही राजीव पाटील आणि दत्ता पाटील यांची आहे. वंशवेल हा चित्रपट स्त्री-पुरूष समानता हा विचार केवळ आदर्शापुरता मार्यादित न ठेवता त्याची अंमलबजावणी माणूसपणाच्या विचारातून करायला हवी हा उद्देश देणारा आणि एकत्रित कुटुंब पध्दतीवर सकारात्मकपणे भाष्य करणारा आहे.