मोहन जोशी – रिमाचा रेट्रो लुक
‘व-हाडी वाजंत्री’ मध्ये कॅब्रे तालावर थिरकणार
रेट्रो साँग किंवा पार्टी साँग म्हटलं की आपल्या ओठांवर नाव येतं शम्मी कपूर यांचं. ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ अशी एक ना अनेक गाणी आपल्या रेट्रो स्टाईलने आणि नृत्याच्या खास अदाकारीने लोकप्रिय बनवली. हिंदीमध्ये एकेकाळी लोकप्रिय ठरलेला हा नृत्यप्रकार आता पुन्हा एकदा मराठीमध्ये बघायला मिळणार आहे, आणि रेट्रो साँगच्या तालावर थिरकणार आहेत मराठीमधील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री रिमा लागू. ‘छू मंतर छू’ असे या गीताचे बोल असून ते राजेश बामुगडे यांनी लिहीले असून अविनाश-विश्वजीत यांनी संगीतबध्द केलं आहे. विजय पाटकर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘व-हाडी वाजंत्री’ या आगामी मराठी चित्रपटात हे गाणं बघायला मिळणार असून या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केलं आहे.
वेगवेगळया धाटणीच्या चित्रपटांनंतर विजय पाटकर यांचा ‘व-हाडी वाजंत्री’ हा नवा विनोदीपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अतुल राजारामशेठ ओहोळ निर्मित या चित्रपटाचं चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आले आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटातून काही तरी वेगळी मेजवानी देण्याचा प्रयत्न विजय पाटकर कायम करतात. याही चित्रपटात प्रेक्षकांना काही तरी वेगळ दयावं ज्यामुळे चित्रपटातही धम्माल उडेल या विचारातून पाटकरांना ही रेट्रो साँगची कल्पना सुचली. अर्थात ती चित्रपटाच्या पटकथेला धरूनच असल्याचंही पाटकरांनी सांगितलं. मोहन जोशींनी यापूर्वा काही चित्रपटात नृत्याचा अनुभव घेतलेला आहे. परंतु नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी अतिशय उत्तम पध्दतीने डान्स स्टेप्स समजावून सांगितल्या. रेट्रो लुक जपत तो कुठेही हास्यास्पद वाटणार नाही आणि प्रेक्षक त्यांचा आनंद घेतील याची पुरेपुर काळजी पाटकर आणि उमेश दोघांनीही घेतली. त्यामुळे या गाण्याचा पुर्णपणे आनंद लुटता आला. मोहन जोशी यांच्यासाठी अशा प्रकारच्या नृत्याचा प्रकार नवा नसला तरी रिमाजींसोबत नृत्य करण्याचा त्यांचा पहिलाच अनुभव होता. याबद्दल मोहन जोशी म्हणाले की, रिमा जेवढी उत्तम अभिनेत्री आहे तेवढीच उत्तम डान्सर पण आहे. त्यांना नृत्य प्रकाराची जाण आहे.. त्यामुळे ‘छू मंतर छू’ सारख्या पार्टा साँगवरही त्यांनी अतिशय उत्तम सोबत करीत नृत्याचा पुरेपुर आनंद घेतला.
अतिशय वेगळया कथेवर आधारित ‘व-हाडी वाजंत्री’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.