Dhamdhoom Marathi Movie breaks records even before release

प्रदर्शनापूर्वीच ”धामधूम” चा अनोखा विक्रम

पहिल्याच आठवड्यात २०६ सिनेमागृहात झळकणार

‘इच्छापूर्ती प्रॉडक्शन’ निर्मित, ‘अनामय प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘धामधूम‘ हा निर्माते रविंद्र वायकर यांचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. येत्या ११ ऑक्टोबरला युफओ टेक्नोलॉजीच्या साह्याने पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक २०६ चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन दिवसाला ३२५ शो द्वारे नवा विक्रम करण्यास ‘धामधूम’ हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. ‘धामधूम‘ मुंबईतील ४७ चित्रपटगृहात झळकणार असून ठाणे जिल्ह्यातील ३८ तर पुण्याच्या २४ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शिवाय महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यातील ७२ सिनेमागृहातून हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मराठवाड्यातील विविध शहरातील १३ चित्रपटगृहात व विदर्भातील १२ चित्रपटगृहातून हा सिनेमा दणक्यात प्रदर्शित होणार आहे.

भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, सयाजी शिंदे, केतकी दवे, आनंद अभ्यंकर, मुग्धा शहा, विनय आपटे, मेघना वैद्य, उदय टिकेकर, आसावरी

Bharat Jadhav, Sidharth Jadhav,  Smita Shewale - Dhamdhoom Marathi movie Still Photos
Bharat Jadhav, Sidharth Jadhav, Smita Shewale – Dhamdhoom Marathi movie Still Photos

जोशी, अश्विनी आपटे, जयवंत वाडकर, किशोर प्रधान, विजू खोटे, अशा अनेक मातब्बर कलावंतांची अफलातून अदाकारी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र पेम यांनी केले आहे. रंगभूमीवर गाजलेल्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचे लेखक – दिग्दर्शक देवेंद्र पेम यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीद्वारे श्री. रविंद्र वायकर हे महत्त्वपूर्ण नाव मराठी सिने इंडस्ट्रीत दाखल झाले आहे. मराठीतील आघाडीच्या कलाकारांची फौज असलेला हा चित्रपट कथा,संगीत आणि इतर तांत्रिक बाजूनीही परिपूर्ण आहे.

एवढी मोठी स्टारकास्ट एकत्र आणणे, त्यांच्या तारख्या जुळवून आणून प्रेक्षकांना पैसा वसूल कॉमेडी देण्याचे आव्हान निर्माता दिग्दर्शकांनी प्रभावीपणे पेललं आहे. गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या या गीतांना अवधूत गुप्तेंनी संगीताची साथ दिली असून नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव आणि राजेश बिडवे यांनी कोरिओग्राफी केली आहे. चित्रपटाचे छायांकन राजा सटाणकर यांचे तर संकलन आनंद दिवाण यांचे आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप आहेत. निखळ हास्याचा आनंद देणारा ‘धामधूम‘ ११ ऑक्टोबरला २०६ चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. तेव्हा प्रेक्षक या चित्रपटाचे जोरदार स्वागत करतील हे निश्चित !