जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या 12 व्या थर्ड आय ‘एशियन फिल्म फेस्टिवल’चे उद्घाटन 3 जानेवारीला पु. ल. देशपांडे कला अकादमीत दूरदर्शनचे सहाय्यक महासंचालक मुकेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिनेकारकिर्दाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता सचिन पिळगांवकर यांचा मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष श्री.किरण शांताराम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.विजय कोंडके, पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका सुप्रभा अग्रवाल, महोत्सवाचे संचालक श्री. सुधीर नांदगावकर आदी अनेक मान्यवर आणि चित्रपट समीक्षक, चित्रापट रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.
सचिन पिळगांवकर यांनी या विशेष सन्मानाबद्दल आयोजकांचे आणि उपस्थितांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. आशियाई चित्रपट महोत्सवाला मिUत असलेल्या वाढत्या प्रतिसादाबद्दल महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी आनंद व्यक्त केला.
3 ते 9 जानेवारी दरम्यान रंगणा-या आशियाई चित्रपट महोत्सवात जगभरातील निवडक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. शुभारंभ प्रसंगी व्हिएतनामी फिल्म ‘कोएन ऑफ स्प्रिंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. या महोत्सवात चीन, जपान, कोरिया, हंगेरी, तैवान, तुर्का, बांगलादेश, इराणी, बंगाली, हिंदीसह निवडक मराठी चित्रपट दाखविले जाणार आहेत. आठवडाभर चालणा-या या महोत्सवात 40 चित्रपट व 27 लघुचित्रपटांचा समावेश आहे. गुरुवार 9 जानेवारीला सायं. 7.00 वा. या महोत्सवाची सांगता ‘आफ्टर शॉक’ या चिनी चित्रपटाने होणार आहे. महोत्सवात लघुपटांची स्पर्धा असून उत्कृष्ट लघुपट दिग्दर्शकाला 50 हजार रपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.