First Look Launch of Marathi Movie “Salaam”

जीवनातील अडी-अडचणींचा सामना करण्यासाठी मानवी मुल्यांची शिदोरी गाठीस असणं फार आवश्यक असतं. सत्य, निर्भयता, सच्ची यारी-दोस्ती, जवळच्या माणसांवरचा विश्वास या अन् अशा अनेक माणुसकीस जपणाऱ्या मुल्यांमुळे जगणं सहज सुंदर होऊन जातं. याच संकल्पनेवर भाष्य करत सकारात्मकतेने आणि खरेपणानं जगण्याचा संदेश देणारा ‘सलाम’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर लवकरच येत आहे.

Photos :

समिक्षकांसोबतच प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलेल्या‘ताऱ्यांचे बेट’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे संवेदनशील दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत हे ‘सलाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी आवर्जून उपस्थित राहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यामध्ये चित्रपटाचे निर्माते डॉ. गौरव सोमाणी, आनंद सोमाणी, कॅलिक्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील सोमाणी, अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता उमेश कामत, ज्येष्ठ सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते ‘सलाम’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर लॉन्च करण्यात आला.

विनोदाची चुरचुरीत फोडणी लाभलेल्या कथानकावर बेतलेल्या या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, आतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा विवेक चाबूकस्वार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ग्रामीण भागातील इरसाल पात्रांचं भावविश्व रुपेरी पडद्यावर साकारणारा ‘सलाम’ हा मराठी चित्रपट 11 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर येऊ घातलाय.