खलनायक म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो एक राकट चेहरा.. क्रुरता, अन्याय, हाणामारी, दहशत यामुळे त्याची वाटणारी भीती त्याच्या अभिनयाने अधिक खरीखुरी भासू लागते. चित्रपटांमध्ये अभिनेता-अभिनेत्रीच्यामध्ये लुडबुडणारा, सर्वसामान्यांना त्रास देणारा खलनायक अनेक प्रेक्षकांच्या डोक्यात जातो. पण आता हे चित्र बदलतेय. स्टाईल, डायलॉगबाजी आणि चकाचक ग्लॅमरमुळे नायकासोबत खलनायकाचा चेहरा बदलतोय. प्रेक्षकांमध्ये आता खलनायकसुध्दा तितकाच लोकप्रिय होतोय. हिंदी सिनेमाप्रमाणे मराठी सिनेमाचा खलनायक देखील आता अधिकाधिक ग्लॅमरस होऊ लागलाय. आगामी आर. विराज दिग्दर्शित ‘संघर्ष’ चित्रपटातून ग्लॅमरस लूक असलेला रघू हा खलनायक प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अभिनेता सुशांत शेलार याने या निगेटीव्ह भूमिकेत रंग भरले आहेत.
‘वंशवेल’ मधला डॉ. दिनेश, ‘दुनियादारी’तला प्रितम अशा आजवर त्याने साकारलेल्या सगळ्याच भूमिकांपेक्षा ‘संघर्ष’मधील ही व्यक्तिरेखा वेगळी ठरणार आहे. कारण अंडरवर्ल्ड डॉन ‘रघूभाई’च्या या व्यक्तिरेखेला असंख्य निगेटीव्ह शेड आहेत. हा खलनायक एका क्षणी खूप क्रुर आहे, तर दुस-या क्षणी शांत. त्याची क्रुरता दाखवायची पध्दत निराळी आहे. चित्रपटाची नायिका त्याला आवडते परंतु तिचं दुस-या कोणावर प्रेम आहे. वेळप्रसंगी तिच्याशी प्रेमाने वागतो, तर कधी तिलाच मारतो. कधी गाणी तर कधी ‘माझं नाव रघू माझ्याकडे बघ बघू’ सारखी डायलॉगबाजी करणारा हा खलनायक कधी कवितेतूनही व्यक्त होतो. स्टायलिश असणारा हा खलनायक चित्रपटाच्या नायकाला प्रत्येक वेळी नडतो. सुशांतने आपल्या अभिनयाने हया भूमिकेला तडफदारपणे जिवंत केलंय. यानिमित्ताने बोलताना सुशांत म्हणाला की, ‘माझ्यासाठी ‘संघर्ष’तील ही भूमिका म्हणजे एक चॅलेंज होतं,जे माझ्या अभिनयाने भूमिकेला न्याय देत मी पूर्ण केलंय. प्रेक्षकांना माझा निगेटीव्ह शेड मधला तडफदार अभिनयदेखील आवडेल असा विश्वास मला वाटतो’.
‘संघर्ष’मध्ये सुशांत शेलार सोबत राजेश शृंगारपुरे, अंशुमन विचारे, नकुल घाणेकर, प्राजक्ता माळी, माधवी निमकर, संगीता कापुरे, अरूण नलावडे, डॉ. विलास उजवणे, अमिता खोपकर, अजय पुरकर, सुलभा आर्य, देवदत्त नागे, सुनील देव यांच्या भूमिका आहेत. ‘संघर्ष’मधील सुशांतचा हा खलनायक 7 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.