मराठी चित्रपटांमध्ये गेल्या काही काळात सकारात्मक बदल होत असले तरी अनेक लोकप्रिय ज्यॅानरांपासून मराठी चित्रपट अद्यापही लांब आहे. बजेटचा अभाव म्हणा, चाकोरीबाहेर जाण्याची भीती म्हणा किंवा कल्पनाशक्तीचं दारिद्र्य म्हणा, पण अनेक चित्रप्रकारांना मराठी चित्रकर्त्यांनी अद्याप स्पर्शही केलेला नाही. असाच एक प्रकार आहे ‘रोड मूव्ही’. दिग्दर्शक विजू माने यांचा आगामी ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ हा चित्रपट मराठीतला पहिला ‘रोड मूव्ही’ ठरणार आहे.
कथेच्या केंद्रस्थानी असलेली प्रमुख व्यक्तिरेखा काही कारणास्तव रस्तामार्गे प्रवासाला निघते. मात्र, या प्रवासात अनेक अडचणी येतात, विविध व्यक्तिरेखा भेटतात, अनेक अनुभव येतात आणि त्या अनुभवांतून त्या प्रमुख व्यक्तिरेखेचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आमुलाग्र बदलतो. जीतेंद्र जोशी, मृण्मयी देशपांडे, हेमांगी कवी आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट नातेसंबंधांकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतो. विजू माने प्रॅाडक्शनचा हा पहिलाच चित्रपट आहे.
महाराष्ट्रातली अनेक अपरिचित, पण देखणी ठिकाणे टिपून रुपेरी पडद्यावर त्यांना चारचांद लावण्याची जबाबदारी पार पाडत आहेत छायालेखक शब्बीर नाईक. विजू माने, प्रकाश होळकर, अभिजीत पानसे आणि जीतेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या गाण्यांना स्वरसाज चढवला आहे चिनार-महेश आणि सोहम पाठक या तरुण संगीतकारांनी.
या संदर्भात विजू माने म्हणाले की, “अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीचा हा चित्रपट हसवता हसवता अंतर्मुख करणारा आहे. ‘रोड मूव्ही’सारखा चित्रप्रकार जगभरात लोकप्रिय आहे. मराठीत मात्र तो कधीच हाताळला गेलेला नाही. ‘शर्यत’ आणि ‘खेळ मांडला’ या दोन परस्परभिन्न प्रकृतीच्या चित्रपटांनंतर माझ्यासाठीही हा अतिशय वेगळा ज्यॅानर आहे. पण केवळ ज्यॅानर म्हणून मी या चित्रपटाकडे खेचलो गेलो असं नसून अतिशय भक्कम कथा आणि तितकीच रंजक आणि वेगळी पटकथा असेल याचीही काळजी घेण्यात आली आहे. कथेनेच चित्रपटाचा ज्यॅानर ठरवला, असं मी म्हणेन!”