चित्रपट… रपेरी स्वप्नांचे झगमगतं जग…
प्रसिध्दी, स्पर्धा, सृजनशीलतेचा शताब्दीपूर्ण प्रवास…
भारतीय सिनेसृष्टीने गेल्याच वर्षा शताब्दीवर्ष साजरं केले. या शंभर वर्षात सिनेसृष्टीने अनेक स्थित्यंतरे पाहिली. मूकपट ते बोलपट त्यानंतर कृष्णधवल ते रंगीत आणि अलीकडे 2D कडून 3D पर्यंत सिनेमाने मजल मारली. चित्रपटाचा हा प्रवास नेहमीच नवनिर्मिती करणारा ठरला. रसिकांचे मनोरंजन करणारं हे माध्यम नेहमीच नव्या रंगरपात अवतरलं. हा प्रवास कधीच कोणा एकाचा नव्हता, तर त्यामागे होते असंख्य हात. नवनिर्मितीचे, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर छंदाने पछाडलेल्या कलावंतांचे. चित्रपट माध्यमच असे आहे की, सगळ्यांच्या योगदानातूनच सकस, दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद रसिकांना घेता येतो. ‘झी टॉकीज’ने नेहमीच या सगळ्यांचे कौतुक केलंय. गेल्या वर्षा शताब्दी वर्षानिमित्त आताच्या आघाडीच्या कलावंतांना जुन्या प्रसिध्द कलावंतांच्या गेटअपमध्ये आणून एक वेगळ्या स्टाईलचे कॅलेंडर प्रसिध्द केले होते. दरवर्षाप्रमाणे यावर्षादेखील ‘झी टॉकीज’ एका वेगळ्यासंकल्पनेवर बेतलेलं कॅलेंडर घेऊन आले आहे.
‘झी टॉकीज’ने 2014 चे यंदाचे कॅलेंडर चित्रपटसृष्टीशी संबधित सर्व पडदयामागील कलावंतांना समर्पित केलंय. या संदर्भात आपले मनोगत व्यक्त करताना ‘झी टॉकीज’ चॅनेलचे बिझनेस हेड श्री. बवेश जानवलेकर म्हणाले की, मनोरंजनविश्वात मोलाची भूमिका बजावणार्या पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञांची कामगिरी बऱ्याचदा दुर्लक्षित राहते. त्यांच्या कामाची पोचपावती कधी त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही. चित्रपटसृष्टीला दिलेल्या त्यांच्या या अनन्यसाधारण योगदानाला ‘झी टॉकीज’ प्रथमच प्रकाशझोतात आणतेय. या कलावंतांच्या प्रतिभेला ‘ग्लॅमर’ मिळवून देत मानाचा मुजरा करतेय’. पडद्यामागील कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाद्वारे ‘झी टॉकीज’ प्रयत्नशील आहे.
पडद्यामागील शिल्पकारांना, त्यांच्या मेहनतीला दाद मिळावी ही ‘झी टॉकीज’ची मनिषा त्यांनी कॅलेंडरच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली आहे. या कॅलेंडरचे प्रकाशन नुकतेच सुप्रसिध्द अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव आणि वीर मराठी टीम उपस्थित होती. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, छायाचित्रणकार, कला दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, संकलक, अॅक्शनमास्टर अशा अनेक कल्पक हातांमधून एक दर्जेदार कलाकृती आकारास येत असते. पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांना घडविण्यात, त्यांच्या यशात नेहमीच या प्रतिभावंतांची सृजनशीलता असते. बॉक्स ऑफीसवर आज मराठी सिनेमा हिट ठरतोय. मराठीसोबत अमराठी प्रेक्षकांनाही आकर्षित करतोय. या सगळ्या यशामागे हे असंख्य बिनचेह-याचे हातच दिवसरात्र राबत असतात. याच प्रामाणिकपणाने राष्ट्रीय पारितोषिक ते थेट ऑस्करवारीपर्यंत या कलावंतांनी मजल मारलेली दिसून येतेय. त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल ‘झी टॉकीज’च्या 2014 च्या कॅलेंडरमध्ये घेण्यात आली आहे.