‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ म्हणत आजच्या पिढीने इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून जग जवळ केलं असलं तरी, मात्र नको इतक्या तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने घरातल्या जिव्हाळ्याच्या माणसांशी संवाद साधायला वेळ नसल्याचे घरोघरी दिसतंय. यातूनच ‘आपल्यावेळी हे असं नव्हत’ हे वाक्य कुठेना कुठे सतत आपण ऐकत आहोत. प्रत्यक्ष संवादातून साधता येणारी जवळीक तंत्रज्ञानाच्या कोरड्या संवादाने कित्येक मैल दूर गेलीय. हा दुरावा कमी करीत, सध्याच्या बदलत्या पिढीचे बदलते संस्कार रेखाटणारा “थोडं तुझं थोडं माझं” हा नवा चित्रपट येऊ घातलाय.
आजच्या तरुण पिढीशी संवाद साधताना पालकांना बऱ्याचदा ‘जनरेशन गॅप’ चा अनुभव येतो. हे तुझं, हे माझं न करता दोघांनीही एक पाऊल मागे टाकलं, तर हा दुरावा नक्कीच दूर होईल. याच विचारातून निर्माते अनिल काकडे यांनी “थोडं तुझं थोडं माझं” हा चित्रपट तयार केलाय. विक्रम गोखले, सुलभा देशपांडे, अजिंक्य देव, वर्षा उसगावकर या अनुभवी कलाकारांसोबत निखिल काकडे नवा चेहरा मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करतोय. सोबत स्वरदा थिगळे, नताशा पूनावाला, विलास उजवणे, पुष्कर जोग, अशोक समर्थ यांच्याही भूमिका आहेत.
चित्रपटात तीन पिढ्यातील विचारधारा पाहायला मिळणार असून विक्रम गोखले आजोबांच्या भूमिकेत, अजिंक्य देव वडिलांच्या भूमिकेत तर मुलाच्या भूमिकेत नवोदित निखिल काकडे दिसणार आहेत. आपल्या वडिलांचे व आपलंही पटत नव्हतं हे जसा आपल्या मुलाशी वागताना प्रत्येक बाप विसरतो, आणि भविष्यात आपल्या मुलाकडूनही त्यालाही हे पटणार आहे असे गृहीत धरतो, पिढ्यांचे हे चक्र मजेदार आहे. “थोडं तुझं थोडं माझं” ची कथाही अशाच नातेसंबंधावर प्रकाश टाकते. कुटुंबाचे प्रमुख दादासाहेबांचे आपल्या गावाशी, परंपरांशी आणि संस्कारांशी घट्ट नातं आहे. त्यांच्याच संस्कारात वाढलेल्या रमेशलाही तीच अपेक्षा समीर या आपल्या मुलाकडूनही आहे. आजच्या तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या समीर भोवतीचं जग हे वेगळेच आहे.
बदलत्या काळाच्या अपरिहार्यतेतून पिढीमध्ये अंतर निर्माण होत असले तरी संवादाच्या आणि समजुतीच्या भावनेतून ते नक्कीच कमी करता येते. हेच नव्याने सांगणारा “थोडं तुझं थोडं माझं” 6 डिसेंबरला प्रदर्शित होतोय.