‘फर्जंद‘ या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार, स्वप्निल पोतदार, महेश जाउरकर आणि अभिनेता, दिग्दर्शक लोकेश गुप्ते “ऋणानुबंध” च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘ऋणानुबंध’ या नव्या चित्रपटाची निर्मिती स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन्स एल.एल.पी. करत असून, वेगळ्या आशय-विषयावरील चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पुणे येथे श्री. सुनील आंबेकर (पूर्व राष्ट्रीय संघटनमंत्री , अ. भा. वि.प.) तसेच श्री. वैभव डांगे आणि चित्रपटातील कलाकार, तंत्रद्य मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
‘एक सांगायचंय…’ या चित्रपटाद्वारे लोकेश गुप्ते यांनी आपली दिग्दर्शकीय कारकीर्द सुरू केली होती. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली होती. आजच्या तरुणांशी संबंधित गंभीर विषय लोकेशनं या चित्रपटात हाताळला होता. आता ‘ऋणानुबंध’ ही एक वेगळी गोष्ट घेऊन लोकेश पुन्हा एकदा सज्ज आहे.
अभिनेता, दिग्दर्शक लोकेश आणि ‘फर्जंद’ चित्रपटाचे
निर्माते ह्या दोघांनीही आपापल्या पहिल्या चित्रपटातून ठसा उमटवणारी कामगिरी केली होती. या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. ‘ऋणानुबंध’ या नव्या चित्रपटातून ते कोणता विषय आणि गोष्ट घेऊन येतात याची नक्कीच उत्सुकता आहे.
येत्या दिवाळीत १३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.