प्रेम…. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक. आपण आयुष्यात कधी ना कधी कुणावर तरी प्रेम केलेलंच असतं पण ते प्रेम आपल्याला आयुष्यभरासाठी मिळतंच असं नाही. कारण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा माणूस मिळायलाही खूप भाग्य लागतं. अशाच प्रेमाची कहाणी सांगणारी ” जुळून येती रेशीमगाठी ” ही झी मराठीची नवी मालिका येत्या २५ नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, शर्मिष्ठा राऊत, योगिनी चौक आणि विघ्नेश जोशी अशा दमदार कलाकारांची फौज घेऊन ही मालिका अवतरते आहे. यासोबतच ललित बदाने आणि प्राजक्ता माळी ही फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. दर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. ही मालिका झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
” जुळून येती रेशीमगाठी ” ची कथा आहे देसाई आणि कुडाळकर कुटुंबियांची. सरकारी नोकरीत कार्यरत असणारे श्री आणि सौ कुडाळकर यांची मेघना ही एकुलती एक मुलगी. डोंबिवलीत राहणारे कुडाळकर सतत एका असुरक्षिततेच्या सावटाखाली वावरत असतात. घराचं दार सतत बंद आणि मनात एक भीती .त्यांच्या या दडपणाखाली जगण्याचा प्रभाव बायको आणि मुलीच्याही आयुष्यावर पडलेला आहे.
दुसरीकडे मुक्तपणे जगणारं देसाई कुटुंब. केवळ घरातील लोकांसोबतच नव्हे तर शेजाऱ्यांशीही सलोख्याचे सबंध असणारं देसाईंच कुटुंब. नाना – माई आणि त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असं हे देसाई कुटुंब . मोठा मुलगा आणि मुलीचं लग्न झालेलं आणि आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती धाकट्या आदित्यच्या लग्नाची. अभ्यासात अतिशय हुशार असलेला आदित्य आता सीए झाला आहे. सर्वांसाठी सतत झटणारा , सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा, समजूतदार अशी आदित्यची ओळख आहे. लग्नासाठी फारसा उत्सुक नसलेल्या आदित्यसाठी मेघनाचं स्थळ येतं आणि मेघनाला बघताच पहिल्याच नजरेत तो मेघनाच्या प्रेमात पडतो आणि लग्नासाठीही तयार होतो. दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरु होते आणि या रेशीमगाठी जुळवण्यासाठी सगळेजण उत्सुकतेने कामाला लागतात. पण एकाच नजरेत मेघनाच्या प्रेमात पडलेल्या आदित्यवर मेघनाचंही तेवढंच प्रेम आहे का ? आदित्यचं प्रेम तिला खरंच समजेल काय ? प्रेम करायला आणि ते मिळायलाही भाग्य लागतं. मेघनाच्याही भाग्यात हे खरं प्रेम आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरं ” जुळून येती रेशीमगाठी ” या मालिकेतून प्रेक्षकांना सापडतील.
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स लिमिटेडची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत देवधर यांनी केलं आहे. कथा आणि पटकथा विवेक आपटे यांची असून संवाद अरुणा जोगळेकर यांनी लिहिले आहेत. येत्या २५ नोव्हेंबरपासून झी मराठीवर दर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. ” जुळून येती रेशीमगाठी ” रसिकांची मनं जिंकायला सज्ज झालीय.
Tags
subh resimgathi com, झी मराठी,
















