Asmita – Lady Detective on ZEE MARATHI

Mayuri Wagh as Asmita - Lady Detective on ZEE MARATHI

गेली चौदा वर्ष मनोरंजन आणि प्रबोधन यांची उत्कृष्ट सांगड घालणा-या ‘झी मराठी’ वाहिनीने प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण आशय आणि विषयांवर आधारित मालिकांचा नजराणा दिला आहे. मराठी दूरचित्रवाणीक्षेत्रात अनेक नवे पायंडे घालणारी ‘झी मराठी’ आता प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे महिला गुप्तहेर–‘अस्मिता’!

चारचौघींसारख्याच दिसणा-या अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री या कायद्याचं शिक्षण घेतलेल्या तडफदार तरुणीने वकीलीसारखा व्यवसाय न स्वीकारता चक्क खाजगी गुप्तहेराचा पेशा स्वीकारला. असा चाकोरीबाहेरचा व्यवसाय अस्मिताने का स्वीकारला आहे ? अत्यंत संवेदनशील असलेल्या विविध प्रकरणांचा छडा अस्मिता कशा पद्धतीने लावत आहे ? या प्रश्नांची उत्तरं ‘अस्मिता’ ही मालिका शोधणार आहे. ‘शोधलं की सापडतंच’ या ठाम विश्वासाने प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावणारी अस्मिता प्रेक्षकांच्या मनातल्या सुप्त गुप्तहेरालाही जागं करणार आहे.

अत्यंत उत्कंठावर्धक असलेली ‘अस्मिता’ ही मराठी दूरचित्रवाणीवरील खाजगी महिला गुप्तहेरविषयक पहिली मालिका ठरणार आहे. आजवर विविध दूरचित्रवाहिन्यांवर अनेक गुप्तहेर-मालिका येऊन गेल्या आहेत, दाखवल्या जात आहेत. केवळ एकामागून एक गुन्ह्याचा छडा लावणं, हेच या मालिकांतील गुप्तहेरांचं काम असतं. ‘अस्मिता’ मालिकेत मात्र अस्मिता अग्निहोत्रीच्या गुप्तहेर-नैपुण्याबरोबरच तिच्या व्यक्तिगत जीवनावरही प्रकाश टाकला जाणार आहे. एक युवती गुप्तहेरासारखा चाकोरीबाहेरचा व्यवसाय का आणि कसा स्वीकारते, तिच्या या निर्णयामुळे आणि या क्षेत्रात तिला मिळू लागलेल्या यशामुळे तिच्या घरच्यांना प्रसिद्धीऐवजी चिंतेच्या टांगत्या तलवारीला कसं सामोरं जावं लागतं, अशा परिस्थितीतही अस्मिताच्या घरचे तिला पाठिंबा कसा देतात, अस्मिता तिच्या साहाय्यकांची सक्षम टीम कशी उभी करते, एकीकडे गुप्तहेरासारखा अवघड पेशा तर दुसरीकडे मुलगी-बहीण-नणंद अशा विविध नात्यांच्या जबाबदा-या या दोन्हींचा मेळ अस्मिता कसा घालते, याचं चित्रण ‘अस्मिता’ मालिकेत करण्यात येणार आहे.

रुची फिल्म्स निर्मित आणि संगीत कुलकर्णी दिग्दर्शित ‘अस्मिता’ मालिकेत मयूरी वाघ अस्मिता अग्निहोत्रीची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडे ब-याच काळानंतर दूरचित्रवाणीवर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘अस्मिता’ ही मालिका ५ फेब्रुवारीपासून बुधवार ते शनिवार रात्री साडे नऊ वाजता झी मराठीवर प्रक्षेपित होणार आहे.

Tags

detective asmita, asmita programme starpravah cast, lady detective serial cast, asmita serial cast,