भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त “फोर्ब्स’ मासिकाने भारतातील काही कलाकारांच्या संस्मरणीय भूमिकांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीत दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले (सामना) आणि अभिनेता उपेंद्र लिमये (जोगवा) यांचा समावेश आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत आनंद व्यक्त केला जात आहे.
“सामना’ (1974) चित्रपटात निळू फुले यांनी “हिंदूराव पाटील’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. उपेंद्र लिमये यांनी “जोगवा’ (2009) चित्रपटात साकारलेल्या तायप्पाच्या व्यक्तिरेखेचीही प्रशंसा झाली होती. या दोन्ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. याबाबत उपेंद्र लिमये म्हणाले, “”भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त “फोर्ब्स’च्या यादीत नाव येणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. “जोगवा’ हा माझ्या कारकिर्दीला कलाटणी देणारा चित्रपट ठरला. तायप्पाच्या भूमिकेने मला बरेच शिकवले. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडली.”
जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या “सामना’ चित्रपटाला 25 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकन मिळाले होते. उत्कृष्ट अभिनयासाठी राज्य सरकारने निळू फुले यांचा गौरव केला होता. “जोगवा’ने राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटवली. उपेंद्र लिमये यांना राष्ट्रीय पुरस्कारासह इतर पुरस्कार मिळाले होते.