Tya Jaganyala ‘SALAAM’ – PROMOTIONAL SONG

Tya Jaganyala 'SALAAM' - PROMOTIONAL SONG

त्या जगण्याला ‘सलाम’

-‘सलाम’ या चित्रपटासाठी तब्बल 30 पार्श्वगायक-गायिकांनी गायलं स्पेशल प्रमोशनल साँग
– बऱ्याच कालावधीनंतर रसिकांना ऐकायला मिळणार समूह गीत

आपलं छोटं आयुष्य मोठं करणाऱ्या प्रत्येकाला‘सलाम’ ही टॅगलाईन असलेल्या या चित्रपटासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 30 पार्श्वगायक-गायिकांनी एकत्र येत एक समूह गीत सादर केलं आहे. “त्या दृष्टीला सलाम, त्या वृत्तीला सलाम, त्या जगण्याला सलाम” असे भावपूर्ण शब्द असणाऱ्या या गीताची रचना वैभव जोशी यांनी केली असून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे संगीतकार नरेंद्र भिडे यांनी हे समूह गीत संगीतबद्ध केलं आहे. टाळ, पखवाज, चंडा, तबला यांसारख्या पारंपरिक वाद्याला गिटार सारख्या आधिनुक वाद्यांची जोड देऊन बांधलेल्या अप्रतिम चालीवर आधारित हे गाणं मराठी संगीतविश्वात सुपरिचित असणारेगझलगायक दत्तप्रसाद रानडे, दिपिका जोग, संदिप उबाळे, अमेय जोग, अजित विसपुते, शंतनु खेर, मेधा परांजपे आदी तीस गायक-गायिकांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे.

या समूहगीतामागची संकल्पना स्पष्ट करताना संगीतकार नरेंद्र भिडे म्हणाले की, “जगत असताना आपल्या आयुष्याला अनेक जण योग्य वळण देत असतात. आपलं जगणं समृद्ध करत असतात. अशा प्रत्येक व्यक्तीला सलाम करण्यासाठी हे गाणं तयार केलं आहे. बऱ्याच कालावधीनंतर रसिक प्रेक्षकांना एक उत्तम समूहगीत ऐकायला मिळणार आहे.”

या प्रमोशनल गीतासोबतच ‘सलाम’ या चित्रपटाच्या प्रमोशनल अक्टिव्हिटींचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण व्यक्ती, घटनांना सलाम करणारे प्रमोशनल व्हिडीओ तयार केले आहेत. प्रमोशनच्या दृष्टीने एक अनोखा व अभिनव प्रयोग असलेले हे व्हिडीओ अनेकाचं लक्ष आकर्षित करून घेत आहेत. ‘सलाम’ या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, रीमा, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, प्रिया बापट, उमेश कामत या मराठी सेलिब्रिटींनी आपलं आयुष्य घडवणाऱ्या व्यक्तींना, प्रसंगांना ‘सलाम’ केला आहे. रुळलेल्या वाटेनं न जाता कल्पक पद्धतीने केलेलं हे प्रमोशन सोशल नेटवर्किंग साईट्सवर सध्या प्रचंड लाईक्स मिळवत आहे.

आपल्या आवडत्या माणसाविषयी असणाऱ्या भन्नाट कल्पना आणि जगण्याच्या प्रत्येक टप्प्यांवर शहाणपण प्रदान करणारे अनुभव या संकल्पनांवर भाष्य करत निखळ मनोरंजनाचा आनंद देणारा ‘सलाम’ हा चित्रपट येत्या 2 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.