छोट्या आयुष्याला मोठा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या प्रत्येकास… ‘सलाम’

जाणत्या- अजाणत्या वयाचा काळ मोठा विलक्षण आहे. या वयात आपली सर्जनशीलता विकसित होत असते. या वयातल्या आपण जे अनुभवतो त्याची आठवण आपल्याला आयुष्यभर राहते. या वयात आपण आपल्याच दुनियेत मश्गुल असतो. आपल्या बापाविषयीही किंवा आवडत्या माणसांविषयी, त्यांचं शौर्य, मैत्री, गुण यांबद्दल काही भन्नाट कल्पना असतात. पण जगण्याच्या टप्प्यावर जसा अनुभव पदरी पडायला लागतात तसं प्रत्येक पोराला शहाणपण येऊ लागतं, पोर जाणतं होत असतं. सरळ, स्वच्छंदी, निरागस विश्वापासून दूर नेणारी व जाणतं करणारी ही प्रक्रियाही मोठी विलक्षण आणि सुन्दर आहे. याच संकल्पनेवर भाष्य करत आपलं आयुष्य घडविणाऱ्यांना हॅट्स ऑफ करणारा ‘सलाम’ हा चित्रपट येत्या २ मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे.

समिक्षकांसोबतच प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलेल्या ‘ताऱ्यांचे बेट’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे संवेदनशील दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत हे ‘सलाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मानवी मनाच्या कोपऱ्याला हळूवार स्पर्श करणारे संवाद व विनोदाची चुरचुरीत फोडणी लाभलेले कथानक यावर बेतलेल्या या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, आतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे, सिद्धेश्वर झाडबुके, सुहास शिरसाट आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा विवेक चाबूकस्वार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

ही कथा आहे सैनिकी परंपरा लाभलेल्या एका गावाची. धकाधकीच्या जीवनापासून दूर असलेलं सुंदर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक गाव. येथील इरसाल पण मनानं निर्मळ असलेली माणसे, त्यांचे दैनंदिन राहणीमान, भोवताली घडणाऱ्या धमाल घटना अन् त्यांचं निरागस आयुष्य यांवर सुंदर पद्धतीने भाष्य करणाऱ्या या चित्रपटात मानवी मूल्यांची तरल पद्धतीने जपवणूक करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांनी केला आहे.

 या चित्रपटाविषयी बोलताना चित्रपटाचे निर्माते डॉ. गौरव सोमाणी म्हणाले की, “मराठी चित्रपट व्यवसायाकडे आम्ही गंभीर दृष्टीकोनातून बघत आहोत. ‘सलाम’ या चित्रपटाद्वारे एक चांगली कलाकृती आम्ही प्रेक्षकांना भेट देत आहोत याचा आनंद अवर्णनीय आहे.” ‘सलाम’ या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रामध्ये दर्जेदार पाऊल टाकणाऱ्या ‘कॅलिक्स मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट’ च्या वतीने भविष्यातही मराठी दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट, सांस्कृतिक महोत्सव अशा विविध दर्जेदार कलाकृती रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहेत.

अजाणत्या वयातून शहाणं होण्याच्या प्रक्रियेदरम्यान आपल्या सर्वांच्या छोट्या आयुष्याला मोठा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या घटनांचं भावविश्व रुपेरी पडद्यावर साकारणारा ‘सलाम’ हा मराठी चित्रपट २ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना आगामी काळात एक अप्रतिम कलाकृती पहायला मिळणार आहे.

Tags

प्राप्त अर्थ,