मराठी चित्रपटाच्या इतिहासात लोकप्रियतेचे, यशाचे आणि कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढणारा, गाण्यासोबतच संवादाने तरूणाईच्या मनावर अधिराज्य गाजवलेला आणि मागच्या वर्षीचा ब्लॉकबस्टर, सुपरहिट ‘दुनियादारी’ येत्या २ फेब्रुवारीला झी मराठीवर संध्याकाळी ७ वा. प्रसारीत होणार आहे.
मराठीतील प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीवर संजय जाधव यांनी ‘दुनियादारी’ हा चित्रपट बनवला. स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानिटकर, सुशांत शेलार अशी तगडी स्टारकास्ट, सुमधुर संगीत, उत्तम कथा, पटकथा, संवाद आणि तेवढंच उत्तम दिग्दर्शन ही ‘दुनियादारी’ चित्रपटाची वैशिष्ट्ये. “दोस्तो की दुनियादारी मे बसी मेरी जिन्दगी ” असं म्हणत मैत्री जगायला शिकवणारी दिग्या-श्रेयसची दोस्ती, या मैत्रीला विरोध करणारी साईनाथ देढगावकरची दुश्मनी, या मैत्रीतूनच शिरीन-मिनूच्या मनात फुललेली श्रेयसबद्दलची प्रेमाची भावना, या मैत्रीचा प्रत्येक क्षण जपत धमाल मजा मस्ती करणारी कट्टा गॅंग असा मनोरंजनाचा सगळाच मसाला ‘दुनियादारी’मध्ये होता.
जुलैमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुनियादारी’ने पुढचे दोन महिने हाऊसफुलचे बोर्ड झळकवत चित्रपटगृहे आणि प्रेक्षकांच्या मनावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. केवळ प्रेक्षकांनीच ‘दुनियादारी’ची वाहवा केली असं नाही तर अनेक नामवंत, जाणकार सिनेसमिक्षकांनीही त्याचं भरभरून कौतुक केलं. याचदरम्यान प्रदर्शित झालेल्या चेन्नई एक्सप्रेसलाही ‘दुनियादारी’ने तगडी टक्कर देत हम भी किसी से कम नही हे दाखवुन दिलं. अनेक चित्रपटगृहात ‘दुनियादारी’ने शंभरी साजरी केली तर काही चित्रपटगृहांत २५ आठवडेसुद्धा पूर्ण केले.
“जिंदगी जिंदगी”, “यारा यारा” सारखी धमाल गाणी, “टिक टिक वाजते डोक्यात” सारखं तरल, हळूवार गाणं, “देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी” सारखं प्रेमभंगातील वेदना मांडणारं गाणं याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सत्तरच्या दशकातील तरूणाईची स्टाईल, ते कपडे, ती विशिष्ट हेअर स्टाईल या सर्वच बाबतीत ‘दुनियादारी’ने वेगळेपणा जपला. मराठीमध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सर्व विक्रम मोडीत काढत ‘दुनियादारी’ने प्रथमच मराठी चित्रपटाच्या कमाईचा आकडा ३० कोटींच्या वर नेला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, गोवा, गुजरातमध्येही यशाची पताका फडकवणारा ‘दुनियादारी’ हा चित्रपट आत घराघरांत पोचणार आहे. येत्या २ फेब्रुवारीला रविवारी महाराष्ट्राचा हा महासिनेमा मराठीच्या महावाहिनीवर म्हणजेच झी मराठीवर संध्याकाळी ७ वा. प्रसारित होणार आहे.
















