करोना विषाणू संसर्गामुळे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरकमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करता आला नाही. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी वैभव महाराष्ट्राचं या खास व्हिडिओच्या माध्यमातून अभिवादन केलं आहे. विशेष म्हणजे, या कलाकारांनी एकत्र न येता त्यांच्याच घरी राहून हा व्हिडीओ चित्रीत केला आहे.
स्वरूप स्टुडिओ आणि चलचित्र कंपनीच्या आकाश पेंढारकर, हेमंत ढोमे यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म हेलोच्या सहकार्याने या व्हिडिओची निर्मिती केली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटातील बघतोस काय मुजरा कर या गाण्याच्या चालीवरच क्षितिज पटवर्धन यांनी नवं गीत लिहिलं आहे. अमितराज यांचं संगीत असून, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी वावरे यांनी हे गीत गायलं आहे.
व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, सुमीत राघवन, शशांक केतकर, रसिका धबडगांवकर, संजय जाधव, प्रार्थना बेहरे, अमितराज, अभिनय बेर्डे, सौरभ गोखले, अनुजा साठे, चैत्राली गुप्ते, लोकेश गुप्ते, सिद्धार्थ मेनन, कीर्ती पेंढारकर, सुयश टिळक, सायली संजीव, प्राजक्ता माळी यांचा सहभाग आहे. या गाण्यात महाराष्ट्रातील महत्त्वाची ठिकाणं, संस्थां यांची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियामध्ये या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे.