Subodh Bhave to direct Marathi Film Katyaar Kaljat Ghusali

गेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक म्हणजे  मराठी रंगभूमीवरचं सोनेरी पान. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लिखाणातून सजलेल्या या नाटकाला पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वर्गीय संगीताने सुरेल स्वरसाज चढवला होता. पं वसंतराव देशपांडे यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेलं हे नाटक आजही रसिकांच्या हृदयात अढळस्थानी आहे. पं. वसंतराव देशपांडे यांच्यानंतर त्यांचा नातू राहुल देशपांडे यांनी हे नाटक नव्याने रंगभूमीवर आणलं. या नव्या संचातल्या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. संगीताची परंपरा जपणाऱ्या दोन घराण्यांमधील संघर्षांवर आधारित हे नाटक आता प्रथमच चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर साकारले जात आहे.

‘एस्सेल व्हिजन’ आणि ‘श्रीगणेश मार्केटिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाची निर्मिती केली जात असून “बालगंधर्व” या गाजलेल्या मराठी चित्रपटातून ‘नारायण राजहंस’ उर्फ ‘बालगंधर्व’ यांची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सुबोध भावे ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक सुबोध भावे, पं. शौनक अभिषेकी, श्रीमती जितेंद्र अभिषेकी, पटकथा लेखक प्रकाश कपाडिया, ओम राऊत, ‘एस्सेल व्हिजन’ टीमसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित होते

‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि मृण्मयी देशपांडे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असून लवकरच इतर प्रमुख कलाकारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. सुधीर पळसाने या चित्रपटाचे छायांकन करत असून विक्रम गायकवाड हे मेक-अप आर्टिस्ट म्हणून काम पहात आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली असून लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीस येईल.