‘Salaam’ is a must watch film – Nana Patekar and Shrirang Godbole

'Salaam' is a must watch film - Nana Patekar and Shrirang Godbole

‘सलाम’ पाहिला नसता तर मी फार मोठ्या आनंदाला मुकलो असतो – नाना पाटेकर

एखादी उत्तम कलाकृती लोकांनी पहावी यासाठी इतरांनी पुढाकार घेऊन त्या मराठी चित्रपटाचे कौतुक करणे ही बाब अभावानेच दिसते. पण ‘सलाम’सारखा आशयघन आणि सर्वार्थाने परिपूर्ण मराठी सिनेमा सर्वांपर्यंत पोहोचावा आणि रसिकांनी एका चांगल्या कलाकृतीचा आनंद लुटावा यासाठी प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते व त्यावेळी ‘सलाम’ चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले.

यावेळी बोलताना अभिनेते नाना पाटेकर म्हणाले की, आजचे जीवघेणे वेगवान आयुष्य जगत असताना आपण कुठेतरी आपल्या संवेदना हरवून बसलो आहोत. निर्मळ निसर्ग, निकोप नातेसंबंध,निरपेक्ष मित्रत्व आणि भांडणंही या गोष्टी आपल्या आयुष्यातून पार हरवून गेल्या आहेत. पण सलाम या चित्रपटाने पुन्हा एकदा माझे बालपण-तरुणपण जागे केले. हा चित्रपट पाहून माझ्या संवेदना मला गवसल्या. मी या चित्रपटात का काम केले नाही अशी खंत मला वाटत आहे अशा शब्दात नाना पाटेकर यांनी ‘सलाम’ चित्रपटाचे कौतुक केले.आपण भोवतालच्या सुंदर निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपल्यातही त्या निसर्गाचे मूलतत्व आहे ही जाणीवच बोथट होत चालली आहे तसेच आपली अभिरुची बदलत चालली आहे. सगळं कसं चटपटीत हवं आहे अशा काळात ‘सलाम’ सारखा आनंददायी आणि आयुष्य समृद्ध करणारा सिनेमा येणं हे खुप चांगलं लक्षण आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तर व्यावसायिक चित्रपट आणि समांतर आशयघन चित्रपट अशी वर्गवारीच करणे मुळात चुकीचे आहे अशा शब्दात चित्रपट प्रेक्षकांच्या मानसिकतेवर भाष्य करताना निर्माते-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले म्हणाले की, सकस कथाविषय असणारा सिनेमाही व्यावसायिकदृष्ट्या चांगला चालू शकतो. ऋषीकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी, चार्ली चॅप्लीन यांच्या उत्तमोत्तम चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला आहे. मग आपणच पैसे देऊन हाणामारी असलेले इतर भाषेतले सुमार चित्रपट का बघतो?‘डोकं बाजूला ठेवून सिनेमा पाहिला’ अशी एक खोटी व्याख्या सर्वसाधारणपणे अशा चित्रपटांना वापरली जाते. असं डोकं बाजूला ठेवून कोणत्याही प्रकारचं आपलं रंजन होऊच शकत नाही, त्यातून आपल्याला हलती चित्रे पाहणे याव्यतिरिक्त काहीही मिळत नाही. त्याऐवजी ‘सलाम’ सारखा एखादा निर्मळ,सहज सुंदर आनंद देणारा चित्रपट आपण का बघत नाही? असे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आज किरण यज्ञोपवित सारखे अनेकजण खुप प्रामाणिकपणे चित्रपट बनवायचा प्रयत्न करतात. पण हे चित्रपट जर का बॉक्सऑफिसवर चालले नाहीत तर निर्माते अशा संवेदनशील विषयांवर चित्रपट काढण्यासाठी तयारच होणार नाहीत. त्यामुळे केवळ बाजारू चित्रपटांचेच जग तयार होईल अशी भितीही श्रीरंग गोडबोले यांनी यावेळी व्यक्त केली.

त्यामुळे मरगळ झटका, उठा आणि ‘सलाम’ सारख्या मराठी मातीतल्या उत्तम प्रयत्नाच्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभे रहा. यामुळेच ‘सलाम’ सारखा मराठी सिनेमा ताठ मानेने जागतिक सिनेमाच्या आव्हानाला सहज सामोरा जाईल असाविश्वासहीयावेळी नाना पाटेकर आणि श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केला.