Marathi film 1909 Premier on day of Jackson’s assassination

बरोब्बर १०४ वर्षांपूर्वी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये इतिहास घडला होता. बालगंधर्वांचे नाटक ऐन रंगात आलेले असतानाच अवघ्या १७ वर्षांच्या अनंत कान्हेरे या तरुण क्रांतिकारकाने नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा वध केला आणि भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील सशस्त्र क्रांतिपर्वाला नवी दिशा दिली. आता बरोब्बर १०४ वर्षांनी, त्याच विजयानंद थिएटरमध्ये, त्याच दिवशी, येत्या २१ डिसेंबर रोजी कान्हेरेंचा हा इतिहास जिवंत होणार आहे. निर्माते अजय कांबळी आणि त्यांचे दिग्दर्शक बंधू अभय कांबळी यांनी कान्हेरेंच्या आयुष्यावर बनवलेल्या ‘१९०९’ या चित्रपटाचा प्रीमिअर नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये होणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०१४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय.

भारताचे कॅनडातील माजी उच्चायुक्त व परराष्ट्र सेवा विभागातील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी शिवशंकर गवई यांच्या हस्ते ‘१९०९’च्या फर्स्ट लुकचे अनावरण नुकतेच मोठ्या थाटात करण्यात आले. गवई यांचे आजोबा नानासाहेब गवई हे अभिनव भारतचे सदस्य होते, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निकटचे सहकारी होते. जक्सन वध प्रकरणातच सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. त्यामुळेच शिवशंकर गवई यांच्या हस्ते फर्स्ट लुकचे अनावरण केल्याचे निर्माते अजय कांबळी यांनी सांगितले. याप्रसंगी ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी’ या आगळ्यावेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘१९०९’ या चित्रपटातील एका नाट्यमय प्रसंगाची झलकही दाखवण्यात आली. पाहणाऱ्याला घटनेच्या केंद्रस्थानी असल्याची अनुभूती देणाऱ्या या तंत्रज्ञानाचा वापर प्रथमच मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘१९०९’च्या निमित्ताने होणार आहे.

स्वातंत्र्यलढ्यावर आजवर अनेक चित्रपट आले. मात्र, स्वातंत्र्यलढ्याचे अनेक पैलू आजही दुर्लक्षित आहेत. मिसरूडही न फुटलेल्या असंख्य तरुणांनी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरोधात सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखाळत स्वातंत्र्यवेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली. असेच तीन तरुण म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे. वयाची विशीही न गाठलेल्या या तरुणांनी २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर तिघेही हसत हसत फासावर गेले. त्याकाळी अवघ्या देशभरात खळबळ माजवणाऱ्या या तीन क्रांतीवीरांची शौर्यगाथा पडद्यावर मांडण्यास ‘१९०९’ हा चित्रपट सज्ज झाला आहे.

निर्माते अजय कांबळी यांनी ‘१९०९’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन अभय कांबळी यांचे असून दिलीप अल्लम हे सहनिर्माते आहेत. अक्षय शिंपी, रोहन पेडणेकर, श्रीकांत भिडे, श्रीनिवास जोशी, शुभंकर एकबोटे, चेतन शर्मा, अमित वझे आदि अनेक उमदे कलाकार ‘१९०९’ मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत.