Ajay-Atul compose theme song for Fandry

मराठी संगीतक्षेत्रातील आजची आघाडीची जोडी म्हणजे अजय-अतुल. मराठी फिल्म इंडस्ट्रीत आपल्या संगीताचं नाणं खणखणीत वाजवल्यानंतर अजय-अतुलने बॉलीवुडमध्ये दिमाखदारपणे एन्ट्री केली. ‘सिंघम’ , ‘अग्निपथ’ आणि इतर काही चित्रपटांमधून आपल्या संगीताच्या जादूने धमाका केल्यानंतर अजय-अतुल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगलेच गर्क झाले मात्र संगीतरसिक मराठी चित्रपटात अजय-अतुलची जादू पुन्हा कधी अनुभवायला मिळणार यासाठी आतूर होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे कारण अजय-अतुलने आपल्या चाहत्यांसाठी आणलं आहे मराठी मातीतील एक अस्सल म-हाटमोळं गाणं. एस्सेल व्हिजनच्या आगामी फॅंड्री या महत्वाकांक्षी चित्रपटासाठीचं हे खास  थीम  सॉंग घेऊन अजय-अतुल तब्बल दोन वर्षांनी मराठीत अवतरत आहेत. विशेष म्हणजे हे गाणं स्वतः अजय गोगावले याने लिहिलं असून त्यांच्याच आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे. निलेश नवलाखा यांच्या नवलाखा आर्ट्स आणि विवेक कजारिया यांच्या होली बसीलची निर्मिती असलेल्या फॅंड्री या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे याने केलं आहे.

समाजव्यवस्थेतील जातव्यवस्थेचं दाहक वास्तव प्रेमकथेच्या रूपातून नागराज मंजुळे याने फॅंड्री मध्ये मांडलंय. दोन विभिन्न जातीतील जब्या आणि शालूची ही कथा. शालूचं प्रेम मिळवण्यासाठी, आपल्या भावना तिच्यापर्यंत पोचवण्यासाठी जब्याची चाललेली आंतरिक धडपड अजय गोगावलेने आपल्या शब्दांतून अचूकपणे मांडली आहे. “ तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला” असे या गाण्याचे शब्द आहेत. दोनेक वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर अजय-अतुल मराठी श्रोत्यांसाठी हे एक सरप्राईज घेऊन येत आहेत. लोककलेचा बाजूअसलेल्या या गाण्यात ढोल, ताशा, संबळ, हलगी अशा विविध वाद्यांचा वापर अजय – अतुल यांनी मोठ्या खुबीने केलाय. या वाद्यांच्या सोबतीला अजयचा आर्त सूर आणि तेवढेच सुरेख शब्द यामुळे हे गाणं श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारं झालं आहे. यु ट्युबवर अपलोड केलेलं हे गाणं सध्या चाहत्यांमध्ये तुफान लोकप्रिय ठरत आहे. या गाण्याला अनेक हिट्स, लाईक्स मिळत आहेत शिवाय फेसबुक, टि्वटर सारख्या सोशल नेटवर्क साईट्स आणि व्हॉट्स अॅप सारख्या लोकप्रिय अॅप्सच्या माध्यमातून हे गाणं मोठ्या प्रमाणावर शेअरही केल्या जात आहे.

विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत कौतुकाचा वर्षाव मिळालेल्या फॅंड्री ला नुकताच पार पडलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृट मराठी चित्रपटासह इतर मानाचे चार पुरस्कार मिळाले. कथा, पटकथा, अभिनय, दिग्दर्शन अशा सर्वच बाजूने भक्कम असलेल्या फॅंड्री ला लाभलेली अजय-अतुल या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकाराच्या भक्कम योगदानाची जोड यामुळे फॅंड्री बद्दल रसिकांच्या मनात चित्रपटाबद्दल कमालीचं औत्सुक्य आहे. सोमनाथ अवघडे, सूरज पवार, राजेश्वरी खरात आणि किशोर कदम यांच्या दमदार अभिनयाने सजलेला फॅंड्री’ हा चित्रपट  येत्या १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.